Skip to main content
बेकिंग.......... माय भुमि न्युज........*प्रबीर पुरकायस्थ व न्या. के. चंदृ यांच्या पुस्तकांच्या मराठी आवृत्तीचे मुंबईत जनशक्ती तर्फे प्रकाशन*९ मे २०२४ रोजी जनशक्ती ग्रंथ प्रकाशनाने लेफ्टवर्ड ने प्रकाशित केलेली दोन महत्त्वाची पुस्तके - प्रबीर पुरकायस्थ यांचे 'फक्त लढ म्हणा', आणि न्यायमूर्ती के. चंदृ यांचे 'ऐका माझी फिर्याद' यांच्या मराठी आवृत्त्यांचे प्रकाशन मुंबईत दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे केले. दोन्ही पुस्तकांचा मराठीत अनुवाद अनुक्रमे मेधा काळे आणि माया पंडित यांनी केला आहे. 'न्यूजक्लिक' चे संस्थापक-संपादक, ७५ वर्षे वयाचे प्रबीर पुरकायस्थ ऑक्टोबर २०२३ पासून गेले ८ महिने 'युएपीए' या भयानक कायद्याखाली आणि धादांत खोट्या आरोपांखाली तुरुंगात खितपत पडले आहेत. ते संपादक असलेल्या न्यूजक्लिक ने गेल्या १५ वर्षांच्या आपल्या आयुष्यात सत्तेला सत्य निर्भिडपणे सुनावल्यामुळे आणि न्याय्य जनआंदोलनांना प्रसिद्धी दिल्यामुळे भाजप-आरएसएसच्या केंद्र सरकारने त्याच्यावर रानटी हल्ला चढवला आहे. हा वैचारिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध कार्यक्रम होता, आणि विविध क्षेत्रांतून आलेल्या श्रोतृवर्गातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.प्रबीर पुरकायस्थ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. चंदृ यांच्या हस्ते, तर न्या. चंदृ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्या हस्ते झाले. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासोबत "लोकशाही आणि नागरिकत्व धोक्यात आहे का?" या विषयावर एक परिसंवाद घेण्यात आला. त्यात वरील दोन्ही न्यायमूर्ती, धर्मांधताविरोधी सामाजिक कार्यकर्त्या आणि सबरंग च्या संपादक तीस्ता सेतलवाड, नावाजलेले पत्रकार आणि पारी चे संस्थापक-संपादक पी. साईनाथ, व लेफ्टवर्ड बुक्स चे कार्यकारी संपादक सुधनवा देशपांडे यांनी आपले विचार मांडले. माया पंडित आणि मेधा काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.वरील सर्व उत्तम भाषणांचा समारोप या कार्यक्रमाचे, जनशक्ती ग्रंथ प्रकाशनाचे आणि अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी केला. जनशक्तीचे संचालक आणि जीवनमार्गचे संपादक डॉ. उदय नारकर यांनी हे प्रकाशन गृह व त्याची अलीकडची प्रकाशने यांची माहिती दिली. जनशक्ती व जीवनमार्ग चे कार्यकारी संपादक विजय पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. स्वागत व सूत्रसंचालन जनवादी महिला संघटनेच्या राज्य सचिव प्राची हातिवलेकर यांनी केले. श्रोत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या हे विशेष. त्यात अनेक प्रमुख वृत्तपत्रांचे माजी संपादक व माजी खासदार कुमार केतकर, दलित पँथर चळवळीचे दोन झुंझार संस्थापक अर्जुन डांगळे आणि ज. वि. पवार, आंबेडकरवादी-मार्क्सवादी विचारवंत आणि भिमा कोरेगाव खटल्यात अनेक वर्षे तुरुंगात राहून जामिनावर सुटलेले डॉ. आनंद तेलतुंबडे, मार्क्सवादी विचारवंत संजीव चांदोरकर आणि छाया दातार, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, कृषी प्रश्नांवरील लेखिका नमिता वाईकर, आणि डाव्या व धर्मनिरपेक्ष पक्षांचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात जनशक्ती ग्रंथ प्रकाशनाची ही दोन नवीन पुस्तके, तसेच गेल्या महिन्यात प्रकाशित झालेले डॉ. अजित नवले-लिखित अस्मितांचे अंतरंग, अलीकडे प्रकाशित झालेले सुधनवा देशपांडे-लिखित हल्ला बोल, डॉ. अशोक ढवळे लिखित जेव्हा गवताला भाले फुटतात, व इतर प्रकाशनांची २५ हजार रुपयांहून अधिक विक्री झाली. चंद्रकांत शिंदे यांनी पुस्तकांचा स्टॉल नेहमीप्रमाणे उत्तमरीत्या सांभाळला , महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog